आनंद यात्रा

अश्याच एका ओलेत्या सकाळी ती अचानक भेटली. किती काळ लोटला कुणास ठावूक . 30 वर्ष का 35 वर्षापूर्वी ती शेवटची भेट .कुठे नक्की आठवतय. अशी वेळ,तारीख आपल्या लक्षात असते आणि नसते सुद्धा. नसते अश्या साठी की आपणच तिला खोल मनाच्या तळाशी जपुन ठेवलेली असते. पण अश्या वेळी मात्र ती उफाळून वर येते.
ओळखल का ? दोघानच्या डोळ्यांत एकच प्रश्न आणि उत्तर सुद्धा.
म्हणाली तुझ्या डोळ्यांत मला गाणं दिसतय..
"आताशा असे हे मला काय होते 
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते "
मी म्हटलं तु अगदी तशीच आहेस. तुला मस्त दिसणारा लाल ड्रेस सुद्धा अगदी तसाच.
तु काही फार बदलला नाहिस. फक्त डोकं आणि पोट जरा....आम्ही दोघही मनसोक्त हसलो.
दहा वर्षाचा असेन मी ,आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा. मग वरचेवर भेटी आणि फिरणे. जोडीने धडपडंणे. कधी खाल्ले ला बर्फाचा गोळा , लाल जर्द कलिंगड तर कधी उसाचा रस. शेताडीत फिरताना पाडलेल्या चिंचा आणि कैरीची मजा. अर्थात तिला यातले काहीच चालायचे नाही.
अशीच काही वर्षं गेली आणि कळत नकळत भेटी कमी झाल्या .
म्हणाली काय मस्त दिवस होते रे.
परत तुला ते क्षण जगायला आवडेल का ?
आणि सुरु झाली एक नवी सफर तिच्या साथीने. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी.
सूर्यॉदया च्या साक्षीने वाफाळलेला चहा आणि मिसळ पाव
सांज ये गोकुळी च्या सुरांत रंगलेला सुर्यास्त
तर कधी रात्रिची सफर सुद्धा
कधी हिरवीगार जंगल वाट तर कधी सागर किनारा ..सोबत पाखरान्चे गूज.
अनादी अनंत चालू रहावी अशी ही आनंद यात्रा
प्रसन्न तांबे


Comments

Popular Posts